Pages

Tuesday, 13 August 2019

'पाणी वाचवा - जीवन वाचवा' (Save Water - Save Life)

विदर्भ साहित्य संघ शाखा तिरोडा व फुलोरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ११ ऑगस्ट २०१९ रोजी मातोश्री terन्स तिरोडा जि. गोंदिया येथे आयोजित 'श्रावणसरी' कविसंमेलन मध्ये कविसंमेलनचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ चे सदस्य मा. श्री लखनसिंह कटरे यांच्या द्वारा विशेष दखल घेण्यात आलेली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंच चे गोंदिया जिल्हाध्यक्ष राजेश डी. हजारे 'आरडीएच' द्वारा लिखित कविता 'पाणी वाचवा - जीवन वाचवा'

प्रस्तावना: सदर कवितेत काखेत कळसी घेऊन पाण्याला जाणाऱ्या चित्रातील चिमुरडीचे मनोगत व्यक्त केले आहे.
====================================================================

कवितेचे शिर्षक: पाणी वाचवा - जीवन वाचवा

कवी: राजेश डी. हजारे 'आरडीएच'

एक म्हण आहे भारतात
"काखेत कळसा - गावाला वळसा!"
तशी ती म्हण म्हणजे नकारार्थीच...
पण आम्ही जगतो ती म्हण...
होय! मी चालते काखेत कळसा घेऊन...
कळसा म्हणा वा कळसी...
काय फरक पडतो(य)?
मी चालते अनवाणी...
फिरते गावभर... करते पायपीट...
भटकत असते सकाळ-सायंकाळ
फक्त पाण्यासाठी... 
होय पाण्यासाठीच!

मी! अन् माझ्यासारख्या कितीतरी
शाळकरी मुली... 
या खेळण्या-बागडण्याच्या वयात
करत असतो पायपीट... 
फक्त पाण्यासाठी...
कधी टंबरेल, कधी बकेट, तर कधी कळसी घेऊन
जसे झेपेल तसे...

शाळेचे गुरूजी म्हणतात-
"मुलींनी शिकायलाच हवे"
ते काय म्हणतात ना-
"मुलगी शिकली - प्रगती झाली"
पण आई म्हणते-
"आधी पाणी मग शाळा"
कारण घरात पाणी नसेल
तर प्यायचे काय? अन् खायचे काय?
पाणी तर लागणारच...

ओss सिटीतले काका
आमच्या गावात पाणी येत नाही; 
असं नाही बरं का?
येतं ना पाणी... टँकरने... 
दोन-तीन दिवसाआड...
कधी पाणी मिळतं... 
तर कधी डोकं फुटतं... 
पाणी भरायच्या भांडणात...
अन् फिरावं लागतं माघारी... पाण्याविनाच!

अन् मग... पुन्हा सुरु होते... 
अनवाणी पायपीट... 
घोटभर पाण्यासाठी...
गावभर... घरापासून शेतापर्यंत... 
तर कधी... परगावच्या वेशीपर्यंत...
अन् जेव्हा मिळत नाही पाणी कुठेही...
तेव्हा मलाही आपलंसं वाटतं 
एक मराठी गाणं...
अन् वाटतं... 
जणू आम्हालाच विचारलय-
"गढूळाचं पाणी, कशाला ढवळीलं?"
पण तुम्हाला काय ठाऊक?
की तेच गढूळाचं पाणी भागवतं...
आम्हा दुष्काळग्रस्तांची तहान...
पुढचा टँकर येईपर्यंत... 
किंवा पडेपर्यंत... पुढचा पाऊस...

पण तुम्हा शहरवाल्यांचं मस्त हाय बुवा...
कारण घरात येतं ना नळाला पाणी... अगदी चोवीस ताssस...
अन् म्हणूनच... तुम्हाला नाही कळणार...
आमची भटकंती... 
कळसीभर पाण्यासाठी...

पण एक मात्र नक्की सांगेन
लहान तोंडी मोठा घास घेऊन... 
तोही पाण्याविना...
कारण आम्हाला सवयच झालीय हल्ली
पाण्याविना अन्न गिळण्याची

तर मी काय म्हणत होते-
ह्म्म... 
तुम्ही किती नासाडी करता पाण्याची? 
होय तुम्हीच!
तोंड धुताना, कपडे धुताना, 
स्नान करताना, भांडी घासताना,
इतकच काय स्वयंपाक करताना सुद्धा?
किती पाणी व्यर्थ घालवता तुम्ही?

हे जरा थांबवा आता...
कारण आमच्या नशीबातली
पाण्यासाठी भटकंती केव्हा संपणार?
व माझ्या काखेतली कळसी केव्हा जाणार... 
हे तर देवच जाणो...
पण तुम्हा शहरवाल्यांना नाही झेपणार
अन् त्याहून महत्त्वाचं म्हणजे-
तुमच्या स्टेटस ला नाही शोभणार
काखेत कळसी घेऊन पाण्यासाठी भटकंती...
अन्यथा अजून एक म्हण तयार करावी लागेल-
"काखेत कळसा शहराला वळसा"
म्हणून म्हणते... 
पाणी काटकसरीने वापरा...

आमचं तर ठीक आहे
तशी आम्हाला सवयच झालीय आता
काखेत कळसा घेऊन गावाला वळसा घालत
पाण्याविना 'जीवन' जगण्याची...
होय 'जीवन'' जगण्याची!
कारण अजून एक म्हण आहे ना-
"पाणी म्हणजेच जीवन"
मग हे 'जीवन' जगण्यासाठी 'जीवन' तर लागणारच
तुम्हालाही व आम्हालाही...
म्हणून शेवटी एकच सांगते-
"पाणी वाचवा-जीवन वाचवा!!"

कवी: राजेश डी. हजारे 'आरडीएच'
पत्ता: घर क्र. १३८९, श्री कॉलोनी,
सरस्वती विद्यालयाच्या मागे, बनगाव (आमगाव)
ता. आमगाव जि. गोंदिया -४४१९०२
भ्र.क्र.: ०७५८८८८७४०१, ०९५११८०७४१२

रचना दिनांक: ०५ ऑगस्ट २०१७/रविवार/११.५२ रात्री (जागतिक मैत्री दिन)
प्रथम प्रसिद्धी: व्हाट्सअप व फेसबुक
पुनःप्रसिद्धी: जागतिक जल दिन २२-२३ मार्च २०१८, 10 अगस्त 
काव्यवाचन: विदर्भ साहित्य संघ शाखा तिरोडा द्वारा आयोजित 'श्रावणसरी' कविसंमेलन, मातोश्री लॉन, तिरोडा जि. गोंदिया, ११ ऑगस्ट २०१९_________________________________________________________________________________

विदर्भ साहित्य संघ शाखा तिरोडा व 'फुलोरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ११ ऑगस्ट २०१९ रोजी मातोश्री लॉन्स तिरोडा जि. गोंदिया येथे आयोजित 'श्रावणसरी' कविसंमेलनात 'पाणी वाचवा - जीवन वाचवा' या स्वरचित कवितेचे काव्यवाचन केल्यानंतर मा.श्री संजीव कोलते यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटक, सुप्रसिद्ध कवी मा.श्री युवराज गंगाराम व कविसंमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ चे सदस्य मा.श्री लखनसिंह जी कटरे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, गुलाबपुष्प व प्राचार्य गो. मो. कोलते लिखित काव्यसंग्रह 'बहरला पारिजातक' स्वीकारताना कवी राजेश डी. हजारे (आरडीएच).

संमेलन विषयी प्रतिक्रिया:


सर्व कवींनी श्रावणसरिंवर एकाहून एक दर्जेदार कविता सादर केल्या; पण त्यातल्या त्यात सदर कविसंमेलनचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ चे सदस्य मा.श्री लखनसिंह कटरे सर यांनी माझ्या "पाणी वाचवा - जीवन वाचवा" या मुक्तछंदात रचीत कवितेतील- 
पण एकमात्र नक्की सांगेन;लहान तोंडी मोठा घास घेऊनतो ही पाण्याविना... 
या ओळींचा संदर्भ घेत आपल्या अध्यक्षीय मनोगतातून माझ्या कवितेतील "तो ही पाण्याविना..." 
या ओळीत दडलेला गूढ अर्थ स्पष्ट करत असताना माझ्या काव्यप्रतिभेवर शब्द सुमनांचा वर्षाव करून माझी केलेली स्तुती सदैव स्मरणात राहील. लखनसिंह कटरे सर सारख्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळवर सदस्यपदी अधिनस्थ जबाबदार आणि ज्येष्ठ साहित्यिक कडून जेव्हा आपल्या कवितेची विशेष उल्लेखनीय दखल घेतली जाते आणि दाद व आशीर्वाद मिळतात ते सदैव स्मरणात राहतात आणि पुढे लिहीत राहण्यासाठी नवीन ऊर्जा प्रदान करतात. सरांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेच लाभत राहोत हिच कामना करून आज ज्येष्ठ सुप्रसिद्ध कवी मा. श्री युवराज गंगाराम सर, मा.श्री लखनसिंह कटरे सर, प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य स्व. श्री गो. मो. कोलते सर यांचे चिरंजीव व स्वतः सुप्रसिद्ध कवी मा.श्री संजीव कोलते सर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत काव्यवाचन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

सदर कविसंमेलन तिरोडा येथे संपन्न झाल्याने माझ्यासाठी निश्चितच विशेष होते; कारण सध्या मी जरी महाकवी भवभूती यांचा वारसा लाभलेल्या आमगाव येथे वास्तव्यास असलो तरी माझे मूळ गाव बरबसपुरा (काचेवानी) तसेच जेथे माझे संपूर्ण बालपण गेले आणि प्रारंभीचे प्राथमिक शिक्षण झाले ते माझ्या मामा चे गाव इंदोरा खुर्द (निमगाव) तिरोडा जवळच असल्याने माझ्या स्वगृही अर्थात तिरोडा येथे काव्यवाचन करण्याची प्रथमच संधी मिळाली याकरिता मला कवी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल विदर्भ साहित्य संघ सारख्या नावाजलेल्या संस्थेच्या तिरोडा शाखेचे अध्यक्ष मा. श्री नरेंद्र पोतदार सर व सचिव मा. श्री देवेंद्र चौधरी सर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच...

-राजेश डी. हजारे 'आरडीएच'
११-१२ ऑगष्ट २०१९ (रविवार-सोमवार), बकरी ईद, रात्री१.३०
तिरोडा जि. गोंदिया - ४४१९११


2 comments:

  1. RDH sir apalyala mamachya gawachi athawan zali Taya badal dhanyawad apan asech pudhe jave apale mother karawe hich subhakamna

    ReplyDelete

Thank you so much for your comment on BookLysis by RDHSir.com! To avoid spam, your comment has been forwarded to the author for moderation purpose. If found all right, your comment will be approved soon!
Thank you so much!

Keep commenting..!

Don't forget to CHECK in NOTIFY ME.

Regards,

Rajesh D. Hajare (RDHSir)
Founder, BookLysis by RDHSir.com
www.rdhsir.com