आज २९ सप्टेंबर! जागतिक नृत्य दिन! त्यानिमित्त सादर करत आहोत आजचे अतिथी लेखक मा. श्री अनिल जाधव शिरपूरकर सरांचा जागतिक नृत्य दिन विशेष लेख: "इथे रोजच तालावर नाचावे लागते!"
"इथे रोजच तालावर नाचावे लागते!"अतिथी लेखक: श्री अनिल जाधव शिरपूरकरआज दिनांक २९ एप्रिल! जागतिक नृत्य दिन!आधुनिक बॅलेचा जनक, जीन जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिन! त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिन जगभरात "जागतिक नृत्य दिन" म्हणून साजरा केला जातो.
मूळात नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र आहे. परंतु वेदांमध्येही याचा उल्लेख आढळतो. नृत्य ही ६४ कलांपैकी असलेली एक कला आहे.
भारतातील ८ शास्त्रीय नृत्यकला (छाया स्त्रोत: PowerPlaza) |
आठ शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत. यातील भरतनाट्यम्, कथ्थक, कथकली, कुचिपुडी, ओडिशी, सत्त्रीय, मणीपुरी आणि मोहिनीअट्टम या प्रमुख नृत्य पद्धती आहेत. हा झाला भारतीय नृत्य प्रकारांचा संक्षिप्त आढावा!
माझ्या मते नृत्य ही केवळ कला कौशल्य नसून तो एक अत्यंत महत्वाचा व्यायाम प्रकारही आहे. नृत्य हा आपला आजवरचा आकर्षण बिंदू ठरलेला आहे. लहानपणी आपण शाळेत लेझीम नृत्य, थोडी समज आल्यावर ढोलवरची पाचपावली, गणपती उत्सव वा लग्न कार्याच्या वरातीत केलेले नृत्य असा नृत्य प्रवास प्रत्येकाचा झालेला असतो. पूर्वी सार्वजनिक जीवनात लग्नाच्या वरातीत नाचणे आणि चित्रपटातील नृत्य दृश्य पाहणे यापलीकडे नृत्याला विशेष स्थान नव्हते. सार्वजनिक जीवनात नृत्याला लोकप्रिय केले ते बुगी वुगी या दूरचित्रवाणीवारील सोनी वाहिनीवर प्रसारीत वास्तविक चलचित्र मालिकेने. यानंतर डान्स इंडिया डान्स (DID), नच बलिये, झलक दिखला जा, दम दमा दम, एकापेक्षा एक, डान्स महाराष्ट्र डान्स, महाराष्ट्राचा अस्सल डान्सर (MAD) या आणि अशा विविध कार्यक्रमांनी नृत्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेवून पोहोचवले. यामूळेच की काय, 'लावणी'प्रधान महाराष्ट्रातही नवरात्रीमध्ये गुजरात मधील 'गरबा' नृत्य कायमचे स्विकारले गेले.
पण आमच्या मते नृत्य हे केवळ अशा कार्यक्रमांपुरते कालमर्यादीत राहीलेले नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेले आहे; ते कसे? हे पुढील उदाहरणांवरून दिसून येते-
लहान असे पर्यंत मुले बालहट्ट करुन आई-बापांना नाचवत असतात. मोठे झाल्यावर शालेय शिक्षण घेतांना मग पालक आणि गुरुजनांच्या तालावर स्वतः नाचत असतात. अजून थोडे मोठे झाले की उच्च शिक्षण घेताना मित्र-मैत्रीणींच्या इशाऱ्यावर नाचतात. मोठेपणी नोकरी शोधून मालकाच्या सांगण्याबरहुकुम नाचावे लागते. नोकरी स्थैर्यानंतर लग्न करुन आयुष्याच्या सहचारी/सहचारिणी (पती/पत्नी)च्या हुकूमावर नाचावेच लागते. एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर तेथील साहेब सांगतील तसे आपण नृत्य करत असतो. थेट दिल्लीपर्यंतचे लोकप्रतिनिधी जो कायदा पास करतील त्याच्या तालावर एक सर्व सामान्य नागरिक म्हणून आपले नृत्य सुरुच असते. पुढे अपत्यप्राप्ती झाली की त्यांच्या तालावर नाचणे आलेच. अपत्ये मोठी झालीत की सून अथवा जावयाच्या इशाऱ्यावर नाचणे क्रमप्राप्तच असते. वृध्दापकाळ जवळ आला की आपल्या शारीरिक व्याधी आणि अपत्ये हे दोन्ही आपल्याला नाचविण्याचे प्रयत्न करत असतात; अपत्ये सुजाण असली तर ईश्वर कृपाच! मात्र तरीही शारीरिक व्याधी दिग्दर्शित नृत्य हे एखाद्या आयटम डान्स सारखे एकदा तरी जीवनात येवूनच जाते. मृत्यूपंथाला आपण टेकल्याची आपल्या वारसदारांना जाणीव होताच त्यांच्या तालावर एक क्लायमॅक्स नृत्य करावा लागतो. शेवटी आपण थकले असू अशा दयाळू भूमिकेतून ईश्वर मानवाकडे पाहतो आणि आयुष्यभर याला आपण नाचविले, आता तरी याला मुक्त करु; या उद्देशाने जणू यमराज आपले प्राण हरण करतात आणि पुढील जन्मयोनीत रवानगी करुन पुढच्या जन्मभर भावी नृत्याची सोय करुन देतात... थोडक्यात काय तर दैनंदिन जीवनात आपण आयुष्यभर नाचतच असतो. मृत्यूनंतर भरपूर धन-संपत्ती जर आपण वारसदारांसाठी सोडून गेलो तर ते ही आनंदाने नाचतात!शेवटी माझ्या एका स्वरचित काव्याने समारोप करुन आपला निरोप घेतो-
"परिस्थितीशी जुळवून घेणे, हेच आपले खरे जीवन; आपल्या खांद्यावरचे ओझे, नाईलाजाने खेचावे लागते!
परिस्थितीच्या हातातले, कळसूत्री बाहुले आपण; इथे रोजच कुणाच्यातरी, तालावर नाचावे लागते!
इथे रोजच तालावर नाचावे लागते!"
जाता-जाता सर्व नृत्यदिग्दर्शक, नर्तक, नर्तकी आणि नृत्य प्रेमींना जागतिक नृत्य दिनाच्या नर्तन शुभेच्छा!
-© अनिल जाधव शिरपूरकर.
श्री अनिल जाधव शिरपूरकर प्रथितयश सूत्रसंचालक असून त्यांना शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर चिंतनपर लिखानाची तसेच जनजागृतीपर व्याख्याने देण्याची आवड आहे. कथाकथन, साहित्य लेखन, वाचन, गीत गायन, संगीत वादन, चित्रकला, अभिनय, दिग्दर्शन इ. क्षेत्रात त्यांना रस असून बालक, पालक, महिला, कर्मचारी व अधिकारी यांच्या तनावमुक्तीसाठी व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळांचे आयोजन तसेच समुपदेशन करतात. त्यांचा "नवरानं रडगाणं" हा अहिराणी कार्यक्रम लवकरच सुरु होत असून सध्या ते नाट्य संहिता व पटकथा लेखन तसेच काव्यगायनात सक्रीय आहेत. संस्कार, संस्कृती, शिक्षण व मानवता यांच्या संरक्षण, संवर्धन व संक्रमणासाठी समर्पित जनजागृतीपर फेसबुक पृष्ठ "संस्कार व शिक्षण जागृती" चे ते प्रशासक आहेत.
- सदर लेख हि अतिथी अनुदिनी पोस्ट (Guest Blog Post) असून जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून आजचे अतिथी लेखक (Guest Writer) श्री अनिल जाधव शिरपूरकर यांच्या संमतीने या अनुदिनीवर प्रकाशित करण्यात आलेली आहे.
© सर्व हक्क लेखकाधीन | श्री अनिल जाधव शिरपूरकर या लेखाचे मूळ लेखक असल्याचा दावा करतात.
सदर लेख किंवा यातील कोणताही मजकूर/कविता निनावी अथवा नाव बदलून प्रसारित केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. सदर लेख मूळ लेखक श्री अनिल जाधव यांच्या नावासह पुनःप्रसारित करण्यापूर्वी लेखक अनिल शिरपूरकर यांची आणि/किंवा या अनुदिनीचे संस्थापक श्री राजेश डी. हजारे यांची परवानगी घेणे तसेच पुनःप्रसारित करताना मूळ स्त्रोत म्हणून या लेखाचा दुवा (link) देणे बंधनकारक आहे.
मूळ लेखक: श्री अनिल जाधव शिरपूरकर
संपादक: राजेश डी. हजारे 'आरडीएच'
छायाचित्र स्त्रोत: विकिपीडिया (१), PowerPlaza/Blogger (२)
very nice article
ReplyDeleteHey keep posting such good and meaningful articles.
ReplyDelete